पीएमपीच्या तिकीट, पासच्या दरात वाढ   

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) बसचे तिकीट आणि मासिक पासच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पीएमपी प्रशासनाकडून  तब्बल दहा वर्षांनंतर बसभाड्यात ही मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे, नवीन दराप्रमाणे १ ते ५ किलोमीटर अंतरासाठी आता दहा रुपये मोजावे लागणार आहेत. तिकीटाच्या दरवाढीबरोबरच मासिक पासचे दर देखील वाढवण्यात आले आहेत. मात्र, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांना देण्यात येणार्‍या सवलती यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
 
पीएमपीच्या मुख्यालयात शनिवारी (३१ मे) संचालक मंडळाची बैठक पार पडली. त्यामध्ये, बस दरवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानुसार या प्रस्तावाला संचालक मंडळाने मान्यता दिली. यापूर्वी २०१४-२०१५ मध्ये पुणे प्रशासनाने ही भाडेवाढ केली होती. नवीन रचनेनुसार ही भाडेवाढ एकूण ११ टप्प्यांमध्ये करण्यात आली आहे. पीएमपीने दहा वर्षांनी केलेल्या तिकिटांच्या दरांमध्ये केलेली फेररचना रविवारपासून (१ जून) लागू करण्यात आली आहे.
 
पीएमपी प्रशासनाने केलेल्या दरवाढीचा परिणाम पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील लाखो प्रवाशांवर होणार आहे. इंधन दरवाढ, देखभाल खर्च, कर्मचारी वेतन आदींचा विचार करून ही दरवाढ केल्याचे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे, तिकिटांचे दर वाढल्यामुळे पीएमपीच्या प्रवाशांच्या खिश्याला कात्री बसणार आहे. 
 
भाडेवाढ केल्यानंतर प्रशासनाने ई तिकीट प्रणाली कॉमन मोबलिटी कार्ड ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशनमध्येही बदल करण्यात आल्याचे, पीएमपीच्या अध्यक्षा डॉ. दीपा मुधोळ-मुंडे यांनी सांगितले.
 
दैनंदिन पास (पुणे व पिंपरी-चिंचवड): ७० रुपये (पूर्वीचा दर ४० रुपये)
दैनंदिन पास (पीएमआरडीए) : १५० रुपये (पूर्वीचा दर १२० रुपये)
मासिक पास : १ हजार ५०० रुपये (पूर्वीचा दर ९०० रुपये)
 
प्रवासाचे अंतर नवीन दर
१ ते ५ किमी १० रुपये
५ ते १० किमी २० रुपये
१० ते १५ किमी ३० रुपये
१५ ते २० किमी ४० रुपये
 

Related Articles